शुक्रवार, १२ जून, २००९

वाचलंच पाहिजे असं काही- अलिप्त दृष्टिकोनातून...

भारत हा शेतिप्रधान देश आहे. आपली अर्थव्यवस्था ७०% शेतिवरच अवलंबून आहे. पण एखाद्या अर्थ तज्ज्ञाच्या नजरेने पाहिले तर अर्थशास्त्राचे अजुनही बरेच पैलु असतात. अशाच काही पैलूंवर प्रकाश टाकणारं पुस्तक म्हणजे नामांकित अर्थ तज्ज्ञ, २००४ ते २००९ या काळात भारताचे अर्थ मंत्री राहिलेले आणि सध्याच्या युपिए सरकारमध्ये ग्रुहमन्त्री असणार्‍या पी. चिदंबरम यांच "अलिप्त दृष्टिकोनातून" हे पुस्तक.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पी. चिदंबरम यांचं अतिशय प्रसन्न हसरं चित्र आहे. आणि "चांगले अर्थशास्त्र प्रत्येकासाटीच चांगली कामगिरी करणारे असते" ही टॅग लाईन आहे. चिदंबरम यांनी एन्.डी.ए. सरकार सत्तेत असताना २००१ ते २००४ या काळात ईंडियन एक्सप्रेस आणि फायनांशियल एक्सप्रेस मध्ये साप्ताहिक स्तंभलेखन केले होते. प्रस्तुत पुस्तक हे या सर्व लेखांचा एकत्रित संग्रह आहे. मूळ ईंग्रजी पुस्तकाचा अनुवाद शारदा साठे यांनी केला आहे.
पुस्तकामध्ये चिदंबरम यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारणाशी निगडित शेती, जागतिक व्यापार संघटना, परकीय गुंतवणूक, अर्थमंत्री, अंदाजपत्रक, वित्तिय धोरण, नैतिकता आणि धोरण, राष्ट्रीकृत उद्योग खाजगी कंपन्यांसाठी खुले करणे, धोरणे आणि प्रशासन, कर आकारणी, राजकारण आणि प्रशासन, राजकारण, निवडणुका, आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकारणापासून दूर अशा १५ विविध विषयांच्या अंतर्गत बरेच मुद्दे मांडले आहेत.
पलनियप्पन चिदंबरम यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अंगी असलेला विनम्रपणा आणि साधेपणा. पण तरीही त्यांचा अर्थशास्त्राचा असलेला प्रचंड अभ्यास आणि सखोल निरिक्षण यामुळे त्यांच्या वागण्यात अतिशय सुस्पष्ट आणि परखडपणा आहे. त्यांच्या सर्व लेखांमधूनही हेच गूण अधोरेखित होतात. त्यांची भविष्याकडे पाहण्याची नजर किती सुक्ष्म आणि व्यवस्थित आहे हे आपण त्यांच्या अर्थमंत्री पदाच्या काळात पाहिलंच आहे. हे सर्व लेख लिहीताना काँग्रेस राष्ट्रीय राजकारणात विरोधी पक्ष होता. पण म्हणून चिदंबरम यांनी लेखांमधुन एन.डी.ए. वर फक्त टीकाच केली आहे असे नाही तर जिथे वाटलं तिथे जसवंत सिंग, अरूण जेटली यांच्या धोरणांचे कौतुक केलेले आहे. तर कारगिल प्रकरणावरून तत्कालिन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या वर त्यांच्या निष्क्रीयतेचे पुरावे दाखवून टीका सुद्धा केलेली आहे.
एकूण पाहता हे पुस्तक अतिशय वाचनिय आहे. काही ठिकाणी थोडं कंटाळवाणं वाटतं पण बाकी अत्यंत वाचनिय. अर्थशास्त्रामध्ये रस असणार्‍या प्रत्येकाने वाचायला हरकत नाही.